Parimal Digital
GetStarted
Login
  • Login
    Enable Location Services
    • Website
    • परिमल
    • परिमल स्तोत्र
    • श्रीमदभगवद्गीता
    • पूजनीय गुरुजन
    • Others

    Others

      Parimal Digital
      Parimal Digital
      Login
      • Login
      • Website
      • परिमल
      • परिमल स्तोत्र
      • श्रीमदभगवद्गीता
      • पूजनीय गुरुजन
      • Others
      GetStarted
      संकटहरणस्तोत्र

      संकटहरणस्तोत्र

      1. Home
      2. परिमल स्तोत्र
      3. स्तोत्र
      4. संकटहरणस्तोत्र

      संकटहरणस्तोत्र

      श्रीविभो नमोजी अगाधा निर्गुणा । पार नाही तुझिया स्वरूपगुणा ।

      जीवमाया झळंबे करूणाघना । सुखदानार्थी रचना करविली कीं ॥१॥

      जय जय पर कृपासागरा । जय निजानंदा अपरंपारा ।

      जय अगणित शक्तिविहारा । धरून रूपाकारा व्यक्त होसी ॥२॥

      जयजयातसी कुंदसादृश्य मूर्ती । जय जया चरीत - विज्ञान शक्ति ।

      वेष्टित स्वयं निजभक्त आकांती । तारिले कीं करूणापती, त्वां अपार ॥३॥

      जय जय तप्त हेमांगकमनी । जय जया जी अमोघ लीळा मोक्षदानी |

      योगिवेषा दंड कमंडलुपाणी । जीवां दयाळा चौदानीं उद्धरिसी ॥४॥

      जय जय कमळदळलोचना । जय गोमतीतीरीं जीवतारणा

      ।ाळलीळा - विलास विद्या बावना । क्रीडशी कीं दयाघना, जीव ममता ॥ ५ ॥

      जय जय श्रीप्रभु आर्यवेषा स्वामी ।करिसी अनियम (अनिमित्त) लीळा दिनीं यामीं ।

      निजपाणि धरूनी तारिली कृमी ।कृपाक्षी मोक्षधामी, ज्ञानिये स्थापिसी || ६ ||

      जय जय चांपेगौरांग कांती । जय जय पूर्णसौंदर्य कृपामूर्ती ।

      वेष्टित जीव माया कैवल्यपती । पदी हिंडसीं क्षिती, पतित काजा ॥७॥

      महिमा न कळे अनंतशक्ती । निज आवडी ओळगती मूर्ती ।

      I

      ऐसा दैवभारे क्रीडे जगती । जीवां धुंडी श्रीपती, अधिकार्या ॥८॥

      जो अनिमित्त बंधु जीवपती । जो आनंद पूर्ण कैवल्यज्योती ।

      तो देव प्रसन्न हेतु धरूनी चित्तीं । श्रीगुरु मजप्रती, दाखविला ॥ ९ ॥

      तया नमन माझे श्रीगुरूपदा । जेणें दाखविले आनंदकंदा ।

      तो उपकार न फिटे मज कदा । देवा परमानंदा, तुचि फेडी ॥१०॥

      अवतार धरोनी त्वा अनंत सृष्टी । जीव उद्धरणी जाहलासी कष्टी ।

      थोर अपराध घालोनी पोटी । स्वभक्त जगजेठी, तारिले त्वा ॥ ११ ॥

      माझे अगणित अन्याय दारूण । तुज म्यां शिणविले कीं दयाघन ।

      मज सृष्टानुसृष्टीं दिधलें ज्ञान । तें निर्फळ दवडोन, नरक जोडिले ॥१२॥

      विश्वहननादी दोष अपार । भेदोनी गेले गगनोदर ।

      रंजीत पातकी कुटिल क्रुर । अमित गिरीवर, वाढिले की ॥१३॥

      लेखन करीता न पुरे धरा । शाईसी न पुरे नीर सागरा ।

      ऐसा अमितदोषी प्रभु माहेरा । अपराध उदरा, घाली माझे ॥१४ ॥

      पतितपावन ब्रिद मेदिनी । ते सत्य करावें जी चक्रपाणि ।

      त्रयोदश माता ममताहुनी । तूं अधिक जननी, बोलिलासी ॥१५॥

      माझी परिसावी विज्ञापना । तूं कृपाळूवा जी आर्तीहरणा ।

      सहस्र अपराधी बाळ जाणा । तो काय माता मना, आणि खेद ॥१६॥

      तैसा तूं मायाळू मज लागीं । ब्रीद दोष सामावितो जगी ।

      हीन मुळ कींद भवरोगी । मी दुर्भेद्य सर्वांगी, कठिणता ॥ १७॥

      ऐसेया पत्थरा प्रेम बुद्धिलता । कोण परी फुटती कृपावंता ।

      खदीर तरूसी कैची मृदुता । सखया अनंता, मायबापा ॥१८॥'

      इंद्रावणाचें मधुर फळ । कोठोनी होतील गा दयाळ ।

      सिंधु उदरीं वडवानळ । तैसा तूं सांभाळ, करी माझा ।।१९।।

      मी तरि नख रोमाग्रावरी अन्यायी ।परि शरणागत जडलो तुझ्या पायी ।

      आतां कृपा साों रक्षी मायाळु होई । मज नाना उपायीं, करूणा सिंधु ॥ २० ॥

      जैसा शक्र वर्षता शिळा धारी । सप्त दिन नग धरोनी करकल्हरीं ।

      रक्षिले वृज गोकुळी गोवासरी । तूं भक्तसखा कैवारी, माय बापा ॥२१॥

      काळियाविषे यमुनाजळीं । मृत्यु पावलें वत्स गोवळी ।

      तुवां कृपादृष्टी श्रीवनमाळी । त्या स्नेह कल्लोळी, जीवविले ॥२२॥

      वन्ही प्रकटला विशाळ वनीं । गोपाळ जळती ज्वाळें करोनी ।

      तूं स्नेहाळू राणा द्रवोनी मनीं । मुखी ग्रासिला अग्नि, द्वादश गांव ॥ २३ ॥

      जळता वाचविले वत्स गोपाळ ।तैसा पाव जी मज तमाळनीळ ।

      नंदा आणिलें वरूणे पूजे दयाळ ।सुखींये यशोदा गोवळ, केले तुवा ॥२४॥

      अघासुरें गोपवत्सें गिळिलीं । देखोनी तुज कणव उपन्नली ।

      उदरीं रिगोनी मूर्ति वाढिन्नली । व्याळ चिरोनि केली, शकलें दोनी ॥ २५ ॥

      आपुले राखिले गोप वासुर । आनंदे जाहला जय जयकार ।

      आतां केवी जाहलासी निष्ठुर । जी करुणासागर, नाम तुझें ॥२६॥

      अहिमुखी राखिले व्रजाधीशा । होसी आर्तदानी परमपुरुषा ।

      ऐसा ब्रिदाचा धरोनी भरवसा । मी करितो जी आशा दीनबंधू ॥२७॥

      गोपी प्रेमें मूर्च्छित सांडोनी । मथुरेसी गेला रथांगपाणी ।

      समूळ कंसा निःपात करोनी | बंदी पिता जननी सोडविली ॥ २८ ॥

      वियोगें भ्रमित जाहल्या गोपीजनी ।शोकाकुल जाणोनी श्रीचक्रपाणि ।

      उद्धवा धाडिसी की समजावणी ।तो देखें वृंदावनी, झाडें सुंकली ॥ २९ ॥

      म्हणे धन्य धन्य हे तरुवर । कृष्णवियोगे सुकले अंकुर ।

      हे जिवीत काई उद्धव निष्ठुर । ऐसा वदे उत्तर, प्रेमें मनी ॥ ३० ॥

      तवं पुढां गोपी देखिल्या उद्यानी । तरुवर कवळिती शोके करूनि ।

      दाखवा म्हणती कृष्ण लोचनी । त्या उद्धवा देखोनी, झोंबिन्नल्या ॥३१॥

      आम्हां दे दे म्हणती श्यामसुंदर ।षण्मास जाहले न बुझती निकर ।

      मग पावलासी तुं सारंगधर ।दग्धली त्यांची अंतरे, नोळखती ॥३२॥

      तेव्हां विद्या देउनी चिदानंद । गोपीसी प्रकटला सुखानंद ।

      ऐसा भक्तवत्सल श्रीगोविंद । जीवा करुणानंद, जीववीसी ॥३३॥

      स्वस्थ मन करी माझें चक्रपाणी ।तुज प्रार्थितों मधुरा वचनी ।

      कां कठीण जाहलासी मज लागोनी ।निजाची जननी, तूचि मयाळू ॥३४॥

      जरासुत आला कन्या कैवारी । मथुरा जन भयभीत सारी ।

      विनवीत तुझे भक्तांगीकारी । पाहोनी आज्ञा करी, क्षिराब्धीशा ॥ ३५॥

      तुझी आज्ञा मानोनी तेणें नारायणे । धाडिले द्विरथ चमू साभरणें ।

      चौभुजां अंगी त्रासिला जरानंदन । सतरा वेळ पिटोनि, जनां राखिले ||३६||

      सागरी रचोनी द्वारिका विभावरी । निद्रिस्त नेलें जना आनंद मातृपितरीं ।

      मुचकुंदा मोक्ष देउनि विवरीं ।तूचि कीं भक्त सखा कैवारी, करुणेशा ॥३७॥

      तुझे गुण वर्णितां किन्नर वाणी ।भीमकी प्रेमें वेधली निजमनीं ।

      ज्वर आला शिशुपाळ वर ऐकुनी ।द्वारके पत्र लिहूनी, विप्र धाडिले ||३८||

      पत्रिका वाचता तमाळनीळ । भक्त मोहें धावलासी तूं कृपाळ ।

      विभांडुनी सकळहि राजदळ । दिधलें रुक्मिणीसी केवळ, सन्निधान ॥ ३९॥

      भौमासुराचिया बंदीखानी ।धावा करिती गोपी कामिनी ।

      सोळा सहस्त्रा पावलासी वृष्णी ।त्वां भौमां मर्दोनी, गोपी आणिल्या ॥ ४० ॥

      पांडव कुंती जळतां लाखा राउळीं ।तूं स्नेहें धांवलासी कौस्तुभ वनमाळी ।

      द्वादश योजनें करोनी कुतळीं ।पांडवकुंती अनळीं वांचविले ॥ ४१ ॥

      बावीस सहस्त्र भूपवृंदा । तुवा बंदी सोडविले गोविंदा ।

      मर्दोनी भीमा हाती जरासंधा । अर्पोनि ज्ञानानंदा, सुखी केले ॥४२॥

      ऐसा भक्तवत्सल ब्रिद मेदीनी । द्रौपदी पावलासी वस्त्रहरणी ।

      कौरवीं उघडी करीतां नितंबिनी । तुवां चीर श्रीचक्रपाणी, पुरविले ||४३||

      पाठिसी उभा घेऊनिया गदा । द्रौपदी लज्जा राखिली आपदा |

      तैसा पाव जीं कैवल्यकंदा । हे परमानंदा, तारी मज ॥ ४४ ॥

      पांडव गेले वनवासा वना । तया अन्नावीन आलीया मुर्छना ।

      द्रौपदी स्मरतां जगज्जीवना । कळवळोनी कृष्णा, धावलासी ॥ ४५ ॥

      समीरे चाले सागरी जळा लाट । तैसा पावलासीं कृपा भर नेट ।

      आदित्यवनीं रविकडून दिधलें ताट ।स्वभक्ता अन्न अविट(श्रीवीट), पुरविलें ॥ ४६ ॥

      दुर्वास जेऊ मागतां मध्यांनिशी । तै द्रौपदी बहीण पाचारी तुजशी ।

      विज्ञानें करोनी शर्तें अन्नरासी । संकटी हृषीकेशी, पुरविलें अन्न ॥४७॥

      हेमपूर दिधले सुदामभक्ता ।ऐसी शक्ती सामर्थ्ये अपार असतां ।

      कोठोनी मज लागी कृपणता ।आणिली दयावंता, हृषीकेशा ॥ ४८ ॥

      सदर्थ शेतीची काटी हीन । भयें हात न लाविती जन ।

      राजसदनीचें मानितीं श्वान । मी म्हणवितों दीन, तुझा प्रभू ॥ ४९ ॥

      कठिण जीवा गांजिता काळकळी |येणें कैसी राहे तवं ब्रिदावळी ।

      म्हणविसी भक्तवत्सल श्रीवनमाळी ।ती ऐकिली संतमेळीं, श्रुति वाक्यें ॥५०॥

      विभू अंगीकारीया शिरोमणी । उत्तरे स्मरिला श्रीचक्रपाणी ।

      द्रोणपुत्रे भेदितां गर्भ बाणीं । चक्र आड करोनि त्वां राखिलें ॥ ५१ ॥

      ऐसा गर्भी रक्षिला परीक्षिती ।पार्थानी घेता धावला सेतीं ।

      कपि प्रतिज्ञा वृथा केली श्रीपती ।ैसविला मारुती, पार्थ ध्वजीं ॥५२॥

      पार्थ प्रतिज्ञा द्विज बाळकां ।तूं वेगीं पावलासीं यदुनायका ।

      पार्थासह जाऊनी क्षीराब्धी लोका । आणिले भक्ततिल्लका, विप्रसुता ॥ ५३ ॥

      सुखी केला द्विज पुत्रदानीं । वाचविला निजभक्त अग्नीं ।

      तूं भूपाळक श्रीचक्रपाणी । मज तारी निदानी, दयासिंधु ॥ ५४ ॥

      मृत सुत दिधला गुरुपत्नी । अर्जुन वाचविला भीष्मबाणीं ।

      ऐसा अंगीकार्या शिरोमणी । कां जी मज लागौनि, उपेक्षिले ॥५५॥

      जयद्रथें अभिमन्यु पापरीला ।फाल्गुनें रवी अस्ता नियम केला ।

      चक्र आड करोनी त्वां सूर्य झाकिन्नला । संग्राम राहिला, चक्रविभूचा ॥ ५६ ॥

      अर्जुना अर्क दावूनी गोपीनाथ ।किरीटीहातीं वधिला जयद्रथ ।

      सूड घेऊनी वन्ही राखिला पार्थ । भक्त कैवारी समर्थ, पाव तैसा ॥५७॥

      जिष्णुसारथी होऊनी केशव । निर्दाळन ( निधन) केले समूळ कौरव ।

      राज्यीं स्थापिलें स्वभक्त पांडव ।ऐसा बाप माधव, दीननाथ ॥ ५८ ॥

      तरी मज वेगीं पाव जी श्रीपती । तूं जीव मयाळू करुणापती ।

      जे कासवी परी आठवी चीत्तीं । तूं स्नेहें ब्रीद ख्याति, सत्य करी ॥५९॥

      अश्वमेधी पार्थासी पावला श्यामशौरी | जिवविली बहुता ठायीं चमू भारी ।

      तूं भक्तजीवसखा कैवारी ।करविले जैत महीवरी, स्वसामर्थ्यं ॥६०॥

      ऐसिया अनंतलीळा सामर्थ्यरासी । तूं जीवा तारिसी हृषीकेशी ।

      धेनु वत्साचिया परी धाव घेसी ।निज भक्ता घालिसी, कृपापाख ॥ ६१॥

      महाशोक हरूनी उद्भवासी ।दिधलें अपरोक्ष रुपदर्शी ।

      लक्षोनी माझिया पापराशी ।तेणें उदास जाहलासी, कृपावंता ॥६२॥

      तरी कोण तारी ऐसा पामर । तुजविण नाहीं कृपासागर ।

      देवता कठिण क्रुर निष्ठुर । तूं अंतरी विचार, बरवें प्रभू ॥६३॥

      कठिण असतां देवता अर्बुजा ।तियाही धावलीया प्रल्हाद काजा ।

      तूं तर दयाळु मयाळु श्रीदत्तराजा । जीव उद्धरण पैजा, व्यक्तलासी ॥ ६४ ॥

      संकटी साह्य होउनि निर्जरासी । बद्रीहूनी येसी सैह्याद्रि लिंगमहीशी ।

      श्रीकरीं घालोनी तारिलें देवलासी । वर देऊनी शयनासी, सैह्यनगी ॥ ६५ ॥

      तूं म्हणविसी आर्तदानी सृष्टीं । हा भरवसा मी धरिला पोटीं ।

      अलर्क त्रितापी तापलासे कष्टीं ।आला तुझिया भेटी, सैह्यांचळा ||६६ ||

      पर्वती चढल्या मध्यें धावुनी ।निज दर्शन देशी मोक्षदानी |

      बोलोनी शंबोली शंबोली त्वा त्रिवाणी । अलर्क आर्तदानी, निववीला ॥ ६७ ॥

      मी पडलो अवखंदी आपदां । तूं धाव धाव गा परमानंदा ।

      शंकरा निवविलें तुंवा वरदा । दर्शन मुकुंदा, सरतें केलें ॥६८॥

      खूण सांगितली रेणुकासतीं । तुझिया दर्शनें अंकुर प्रचिती ।

      भेटीं परशुराम धाला चित्तीं । स्थापिलें मूळपिठीं, रेणुकेसी ॥ ६९ ॥

      रुचिक ऋषी वारु पांच शत । देवा देऊनी पुरविला मनोरथ ।

      तैसा पाव मज श्रीदत्त । आर्तदानी अनंत, देव देवा ॥७०॥

      सहस्रार्जुन थापा इंगळ । घेता प्रसन्न जाहलासी दयाळ ।

      I

      देवोनी सहस्र बाहुबळ । सुखीया भूपाळ, केला तुवां ॥७१॥

      गोरक्ष बोधिला त्वा जगजेठी ।करीसी भिक्षा करवीरपिठी ।

      नित्य भोजन गंगा वाळवंटी । धावसी जीवासाठी, कृपावंता ॥७२॥

      तरी माझी कणवा कां नये मुकुंदा । तूं भक्तवत्सला परमानंदा ।

      माझिया अपराधा नाही मर्यादा ।तेणें उदास गोविंदा, जाहलासी तुं ॥ ७३ ॥

      मी सर्वही पामरा माजी पामर । दुष्ट क्रूर कृतघ्न भ्रष्ट निष्ठुर ।

      अधमाहुनी अधम शोच्य नर । तूं करी अंगीकार दयानिधी ॥ ७४ ॥

      ऐसा पतित मी, उदारा । तूं होसी पतितपावन दातारा ।

      मज उपेक्षूं नको करुणाकरा । देवा भक्तमाहेरा, जगजीवना ॥७५॥

      झळंबोनी दुःखीं जीवास न्याहाळी ।टाकिसी पुंजा गोमती जळी ।

      तैल्यपाकीं दग्धली करांगुळी |कामाख्या तात्काळी, निवविली ॥७६॥

      चिद्धवा बाळ वत्सा जिववीसी । कंटक फेडूनी धांव घेसी ।

      स्नूषा स्मरता निजमानसी । त्या जाऊनी वाढिसी, क्षीर सखया ॥ ७७ ॥

      मनुष्यरुपें मायावेषी अवगणीं ।जीव उद्धरसी सदा मेदिनी ।

      पंचकुळगुरु ग्रहत्वापासोनी ।त्वां उच्छिष्ट देऊनी, सोडविला ॥७८॥

      तूं पेंधी वनिता जिववीसी । गोवारी ज्वर अंगीकरिसी ।

      काळस्फोटवधु शांतविसी । त्यासी जाऊन देसी, चरणजळ ॥७९॥

      फणी दृष्टी देऊनी प्राणदान ।पाणु द्विजाचा समीर हरून ।

      त्वां सुखी केली पुरी स्त्री तारून ।तारिले ज्वर निरसोनि, रेईविप्रा ( रेईनायका) ।८०॥

      पांगुळ स्तुति करिता नागार्जुन । तूं प्रसन्न जाहलासी सामर्थ्यघन ।

      निज निळभट्टा करितां स्तवन । इंगळी विष हरून, सुखी केलें ॥ ८१ ॥

      नागदेवा उदरीं ठेउनि पद । दयावंता हरिसी संकट व्याध ।

      ऐसा दुःखहारक श्रीगोविंद । दर्शने पशुपद, सुखी होती ॥८२॥

      धन्य दर्दुरू खग गोधन । शशक महिषा तुरंगम पंचानन ।

      जळचर स्थावर बरवी सगुण । धिग धिग दैवहिन, मी दुरात्मा ॥ ८३ ॥

      विभु वेधे बोधका कमनियमूर्ति । पक्षी चतुष्पदें वेधे सुखी होती ।

      मज पतितासी पाहे कृपापती ।शारंगद्विजा प्रती, दिधलें तैसे ॥ ८४ ॥

      पोटी घालूनी अन्यायखंती । पुन्हा दर्शन दिधले श्रीपती ।

      धन्य वाणु त्यांची भाग्य स्थिती । मज कैवल्यपती, कै भेटसी ॥८५॥

      तुझे नाम धरूनि हृदयासी ।निश्चय ठेविला की हृषीकेशी ।

      जै साधा तारिली बुडता गंगेसी ।देवा तवं नामघोष उच्चारितां ॥ ८६ ॥

      ऐसें नाम तुझे क्लेश हरण । प्रभुनाम तुझें पतितपावन ।

      देवा नाम तुझें भवनाशन । मी वारंवार वंदून प्रार्थितों कीं ॥ ८७ ॥

      हैं जीवतारका दयामूर्ती ।मज पावे वेगीं कैवल्य ज्योति ।

      अमित दोष विसरोनी खंती ।धुंडिता श्रीपती, मी नव्हे शुद्ध ॥८८॥

      निंबां कैचें आम्रफळ मधुर । अर्कद्रुमा कोठोनी सुधाधार ।

      तैसा मी दुर्भेद्य मूळाधिकार । बुडता काढी श्रीधर, भवक्लेशी ॥ ८९ ॥

      चातकाची आर्ति पुरवी घन ।चकोरा निववी शशांक पूर्ण ।

      पक्षिणी पिलां ये चारा घेऊन ।मासोळी फिरोन, पाहे बाळका ॥९०॥

      याहीहुनी हरलासी जीव तारका । धीर नव्हे मज ये भक्तपाळका ।

      जाणसी अंतरबाह्य प्रकाशका । निजज्ञानमयंका, शक्तीमंडणा ॥९१॥

      अगाध लीला भवनाशना । करुणा तारिशी जीव नाना ।

      पद्मनाभा प्रकाश गहना । जी माझी करुणा, कां न येई ॥९२॥

      देवा मयावंता तुझे स्वरूप । जीव उद्धरिशी मानवरूपा ।\

      गिरीं कंदरीं तारिलें अमूप । हिंडसी मायबापा, निज पदीं ॥९३॥

      दर्शनें वेधें सुखी होती । ते देवन्य देवन्य पाचारिती ।

      आदि विश्वंभरा विश्वमूर्ती । करुणा श्रीपती, येऊं द्यावी ॥ ९४ ॥

      जगद् उद्धारणा जगजीवना । निजबोधरूपा ज्ञानदाना ।

      आदिपुरुषा भवतारणा । कृपादिगुणा ब्रिद धारा ।। ९५ ।।

      अनिमित्त बंधु आर्तदानी । मज कळलासी निज कर्णी ।

      मंगळनामा मंगळ दानी । जीवा कर्मश्रेणी नाशका जी ।। ९६ ।।

      सज्जन जीवना सुखदाता | भवभयनाशा सर्वकर्ता ।

      भक्तकैवारी अभिमान घेता । तुजविण परता सृष्टी नाहीं ॥ ९७ ॥

      निजमूर्ति मुनिजन ध्याया । कृपासमुद्रा करुणालया ।

      विचित्रलीला सूत्रधारिया । आज्ञा निजमाया करी तुझी ॥ ९८ ॥

      आज्ञा करुनिया निज शक्तीं । कृपा साों तारी कृपामूर्ती ।

      विलंब न करावा श्रीपती । ऐका विनंती, माझी प्रभो ॥ ९९ ॥

      विलंब जरी लाविसी गोविंद ।तरि देवा अनाथनाथ हे ब्रीद ।

      कैसे मानिती तुझे भक्तवृंद |धरिला मुकुंदा, भरवसा मियां ॥ १०० ॥

      अहो जी स्वामिया कैवल्यपती । काय स्तुती करूं मी मंदमती ।

      अनंता धाव धाव त्वरा गती । ऐसा समयो चित्तीं, पावे मज ॥ १०१ ॥

      पुरवी प्रभू माझी मनआशा । जगजीवना जगन्निवासा ।

      निजजन कैवारी मनतोषा । तारी परमपुरुषा मायापती ॥ १०२ ॥

      सर्व संकटे करी निवारण । सृष्टी सखा नाहीं तुजविण ।

      परमार्गी देई एकता मन । मुखी नाम स्मरण सदा देई ।। १०३ ||

      हृदयी व्हावे पंचमूर्तीचे ध्यान । अति चोळ सुरंग श्रीचरण ।

      सरळ पद पल्लव सुलक्षण । नखे तारांगण मनीं जडावी ॥ १०४ ॥

      उंच धुरा घोटे त्रिकोण तेजाळ । ब्रम्हरस पोटऱ्या जंघा सरळ ।

      कटीं चीर त्रिवळी दोंद वर्तुळ । सखोल नाभीकमळ, रोमराजी ॥ १०५ ॥

      विशाळ वक्षस्थळ शोभा पूर्ण ।विमळ बाहो नागर अजानु ।

      दिग्गज सोंडाकृती सुलक्षण ।अतिकुंकुम वर्ण, करतळे ॥१०६ ॥

      सरळ अंगोळीया नख सुधाकर । कंठ विलसत शंखाकार ।

      हनुवटी द्वितीया शशिकोर । सुरंग अधर, विराजती ॥। १०७ ।।

      दशन श्रेणीचे तेज कल्लोळ |मिरवे श्रीमंत नासिक सरळ |

      खंजिटरूह (खंजिररूह) लोचन विशाळ ।भृकुटी श्यामळ, चंपाकृती ।। १०८ ।।

      द्वय विराजताती लंबकर्ण । उंच विशाळ भाळ शोभा पूर्ण ।

      शृंगार मंडित किरीट भूषण । पंच मूर्ति लोचन, कै मी देखे ॥ १०९ ॥

      हे अनंतरूपा श्री अनंता । सर्वगुणालय श्रीदत्ता ।

      जीवतारका कृपावंता । भेट अत्रिसुता, द्यावी मज ॥११०॥

      संकष्टी लीळा करिता स्मरण । संकटे हरती सर्वही जाण ।

      निश्चय ठेऊनी करीतां पठण । इच्छिले ते पूर्ण, पावेल सत्य ।।१११॥

      अंती विनवी भावे जोडूनी कर । प्रार्थितो म्लानवदनी दामोदर ।

      माझे संकट वारी दे प्राप्तीवर ।वाहिला बारोत्तरसे, हार वाक्पुष्पी ॥ ११२ ॥

      इति श्री परधर्मे महामोक्षैकसाधने नागार्जुनोपदेशे उपाध्याम्नाय दीक्षित दामोदरमुनी विरचित संकटहरणस्तोत्रं संपूर्णम । शुभं भवेत्

      Parimal Digital
      Vishal Shri Geeta Bhawan
      Sector 52, Chandigarh
      160036
      Chandigarh, India
      Working Hours
      Monday-Friday
      10am-6pm
      Click to Follow
      Contact Us
      [email protected]+91-8146148002+91-9877426467
      Copyright © 2024. All Rights Reserved.
      Designed By: Keshav Mahajan